Saturday, July 4 2026 3:49 am
latest

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू देणार नाही – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 03 – पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासन कालबद्ध कार्यक्रम राबवून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणार आहे. या शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेला उत्तर देताना दिली.

सदस्य श्रीकांत जगताप यांनी उपस्थित केलेल्या विषयावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंध्रा, भामा आसखेड आणि पवना या धरणांमधून एकूण १० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. सध्या शहरात सुमारे ८ टीएमसी पाण्याचा वापर होत असून मंजूर क्षमतेतील २ टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध आहे. तसेच पवना धरणातून थेट बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा झाल्यास सध्या होणारी ३० ते ४० टक्के पाण्याची नासाडी टाळता येऊन आणखी सुमारे २ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते.

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, मुळशी धरणातून १० टीएमसी पाणी उपलब्ध करण्याबाबत शासनाची प्रक्रिया सुरू असून यासंदर्भात संबंधित घटकांशी चर्चा सुरू आहे. मात्र या भागातील धरणांवरील वाढते बिगर सिंचन आरक्षण आणि शेतीसाठी निर्माण झालेली पाण्याची तूट याचाही विचार करावा लागणार आहे. मुळशीमधून उपलब्ध होणारे पाणी प्रामुख्याने शेतीसाठी देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २०४१ पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज असून त्या अनुषंगाने पाण्याचे फेरनियोजन, जलपुनर्वापर क्षमता वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यात येइल, असे त्यांनी सांगितले.