Saturday, July 4 2026 4:57 am
latest

कांदिवलीतील माथाडी कामगारांच्या जागेतील अनियमिततेची चौकशी करून जागा ताब्यात घेण्याचे निर्देश देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कामगारांसाठी घरे बांधण्याबाबत शासन सकारात्मक
मुंबई, 03: कांदिवली येथील माथाडी कामगारांसाठी असलेल्या जागेबाबत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले असून, या प्रकरणाची तपासणी करून संबंधित जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. तसेच, या जागेवर माथाडी कामगारांसाठी घरे बांधण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कांदिवली येथील माथाडी कामगारांच्या शासकीय भूखंडाच्या हस्तांतरण व पुनर्विकासातील कथित अनियमिततेबाबत सदस्य हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य योगेश सागर आणि अरुण कांजी यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, माथाडी कामगारांना न्याय मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. शासनाने खासगी विकासकाला दिलेल्या जागेवर गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या असतील, तर तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या हिताचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनियमितता आढळल्यास रहिवाशांच्या हिताचा विचार करून त्यांच्या घरांचे नियमितीकरण करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, विशाल सह्याद्री संस्थेकडे कब्जेहक्काने प्रदान करण्यात आलेल्या ११,५८८.७५ चौ.मी. क्षेत्रापैकी ११,२५४.३० चौ.मी. तसेच भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या ९९,११६ चौ.मी. क्षेत्रापैकी ७२,२१६ चौ.मी. असे एकूण ८३,४७०.३० चौ.मी. क्षेत्र शासनाच्या पूर्वमान्यतेने भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. संस्थेच्या विनंतीनुसार शर्तभंग नियमानुकूल करून आवश्यक रूपांतरण शुल्क वसूल करण्यात आल्यानंतरच संबंधित जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यात आले. त्यानंतर संस्थेने विकास करारनामा केल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी, कुर्ला यांच्या अहवालान्वये जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या निदर्शनास आले असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.