Monday, June 22 2026 9:02 pm

दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ठाणे, 22 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमात योग मार्गदर्शक प्रविण धुरी आणि मनोज पटेल तसेच अॅथलेटिक प्रशिक्षण योजनेतील योग प्रशिक्षक मंगला देवरुखकर व डॉ. सुधीर देवरुखकर यांनी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर करून सहभागींकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला.

योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतो आणि जीवनशैली अधिक संतुलित व सकारात्मक बनते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले.
या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या कबड्डी व क्रिकेट संघातील खेळाडू, अॅथलेटिक प्रशिक्षण योजनेतील खेळाडू, योजना प्रमुख अशोक आहेर, राजेंद्र मयेकर, क्रीडा समन्वयक बरकडे तसेच क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.