Saturday, July 4 2026 9:47 am
latest

जव्हारच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत प्रस्ताव सादर करणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 03: समग्र शिक्षण योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये कार्यरत असून पालघर जिल्ह्यात प्रकार-२ मधील पाच विद्यालये सुरू आहेत. जव्हार येथील विद्यालयातील १५ पैकी १० कर्मचारी सध्या कार्यरत असून कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

जव्हार (जि. पालघर) येथील कस्तुरबा गांधी निवासी आदिवासी बालिका विद्यालयातील १५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस दिल्याबाबत विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रम काळे आणि प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करार पद्धतीने करण्यात आली असून दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा तांत्रिक सेवा खंड देऊन त्याच कर्मचाऱ्यांना नव्याने करारावर नियुक्त केले जाते. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार त्यांना नियमित मानधनही अदा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईच्या १३ एप्रिल २०२६ च्या परिपत्रकानुसार पालघर जिल्ह्यातील प्रकार-२ मधील सर्व कस्तुरबा गांधी विद्यालयांतील करारावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ मार्च २०२६ रोजी तांत्रिकदृष्ट्या समाप्त करण्यात आल्या. त्यानंतर १ एप्रिल रोजी एक दिवसाचा तांत्रिक सेवा खंड देऊन २ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून एप्रिल-२०२६ महिन्यापर्यंतचे मानधनही अदा करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कस्तुरबा गांधी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून विद्यालये बंद करण्याचा कोणताही विचार नाही. समग्र शिक्षण योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आणि अन्य संबंधित कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू आहे. तसेच आवश्यकतेनुसार रिक्त पदेही भरली जातील.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये ही मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या अधिक विकासासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.