Wednesday, April 1 2026 11:38 am

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिकेतील सभागृह नेते कार्यालयाचे व नुतनीकृत करण्यात आलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन

 

ठाणे, 01 : ठाणे महानगरपालिकेतील नुतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचे तसेच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचे उद्घाटन मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त सौरभ राव, राज्यसभेच्या खासदार प्रा. ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे, नगरसेवक, नगरसेविका,अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगरअभ‍ियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, उपनगरअभ‍ियंता विद्युत शुभांगी केसवानी, सुधीर गायकवाड, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, तसेच विविध वृत्तपत्राचे व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभागृह नेतेपदी हणमंत जगदाळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयाचे नुतनीकरणाचे काम प्रशासनाने सुरू केले होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सभागृह नेते कार्यालयात प्रवेश केला.

नुतनीकृत पत्रकार कक्षाच्या उदघाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थ‍ितीत तसेच कोविडसारख्या आपत्तीच्या काळातही पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केले असून, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत प्रशस्त व सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे-बोरीवली बोगदा यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच घोडबंदर परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही लवकरच होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पत्रकार कक्षाचे काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसेच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेचे कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.