Wednesday, May 6 2026 4:57 pm

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी उद्या शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

ठाणे,06 : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविणे आणि त्यातील अडचणींवर मात करण्यासाठी उद्या, ७ मे २०२६ रोजी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथे एका भव्य एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी विकास मंत्री यांच्या संकल्पनेतून होणारी ही कार्यशाळा ‘आत्मा मालिक शैक्षणिक संकुल’ येथे पार पडणार असून यावेळी स्वतः आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्यासह सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे आदिवासी विकास अपर विकास आयुक्त गोपीचंद कदम,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वाजता नोंदणी आणि चहा-नाष्ट्याने होईल. त्यानंतर, विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रकल्प अधिकारी, शहापूर यांनी तयार केलेल्या विशेष प्रचार प्रसिद्धी वाहनाचे उद्घाटन करण्यात येईल. या कार्यशाळेत केवळ नियोजनावरच चर्चा होणार नाही, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या आणि परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळविलेल्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा विशेष गौरवही केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘Shaping Futures: A journey of tribal development in Palghar’ या कॉफी टेबल बुकलेटचे अनावरण आणि शाळा प्रवेशोत्सवासाठीच्या ‘जिंगल’चे लोकार्पण. जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या ‘बेंगलोर भेट’ या नाविन्यपूर्ण योजनेची माहिती चित्रफीतही यावेळी दाखविण्यात येईल.
दुपारच्या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत (NEP) सखोल मार्गदर्शन केले जाणार असून, नाशिक आणि ठाणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्रमशाळांमधील सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि गुणवत्ता वाढीचा आराखडा सादर करतील. या कार्यशाळेत विविध प्रकल्पांचे मुख्याध्यापक, गृहपाल आणि अधीक्षक यांच्याशी थेट संवाद साधला जाणार असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी दिली आहे.