Thursday, February 19 2026 2:41 pm

अतिक्रमणे हटवून कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा 19 – कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बराच काळ रखडले असून या रस्त्यावरील पाटण एसटी स्टॅण्डच्या परिसरातील अतिक्रमणे हटवून तात्काळ कामे सुरु करावीत व रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्यातील विविध विकास कामाच्या विषयांची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपूते, मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, पोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस, महावितरण अभियंता श्री. रासकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात आदी उपस्थित होते.

कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे बऱ्याच काळापासून रखडले असून याबाबत वारंवार बैठका घेऊन सूचना देण्यात येत आहेत. तथापि या कामात आवश्यक प्रगती होत नसल्याने पालकमंत्री श्री. देसाई यांनी याबाबत नाराजी व्यक्त करुन एसटी महामंडळाने अतिक्रमण काढण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी आणि रस्ता कामासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम त्वरीत पूर्ण करुन द्यावे, असे सांगितले.

प्रादेशिक पर्यटन विकासमधील अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करुन द्यावीत असे सांगून सन 2022-23 मध्ये पर्यटन विभागाने पर्यटन विकासासाठी दिलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे प्रशासनाने लवकरात लवकर सादर करावीत.  त्यानंतर उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दौलतनगर परिसरात साधारणत: 150 किलोवॅटचे सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत. ही पॅनेल नेटमीटरवर घेण्यात आली आहेत.  कार्यान्वित असलेल्या सोलर पॅनेलद्वारे वीज बिलात कीती बचत झाली याची माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले.