Friday, October 9 2026 2:32 am

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला निरंजन डावखरेंची भेट

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; मागण्यांवर चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन
पुणे, 08 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री पेठ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचे भवितव्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत २५ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यापूर्वी दोन-तीन वेळा सविस्तर चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांची फी माफी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील प्रश्नांसह सुमारे २० ते २२ मागण्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे डावखरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासन संवेदनशीलतेने पाहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत कायदेशीर प्रक्रियाच
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा हा घटनात्मक पदाशी संबंधित असल्याने त्याबाबत निश्चित कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे आंदोलन केवळ या एका मागणीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांची फी माफी, परीक्षा पद्धती, मार्किंग आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे डावखरे यांनी सांगितले.
‘ऑब्जेक्टिव्ह’ पॅटर्नवर सहा सदस्यांची समिती
‘ऑब्जेक्टिव्ह’ पॅटर्नसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सूचना, हरकती आणि मागण्या या समितीसमोर रीतसर मांडाव्यात. समिती विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध बाजू समजून घेत असून, त्यानंतर पुढील निर्णयप्रक्रिया केली जात असल्याचे डावखरे यांनी सांगितले.
रात्रंदिवस मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होता कामा नये. परीक्षा पद्धती, मार्किंग किंवा अन्य प्रक्रियात्मक बाबींमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाला राजकीय रंग नको
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय हेतूंसाठी होऊन त्यांचे मूळ प्रश्न भरकटू नयेत, अशी अपेक्षा डावखरे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या वास्तविक आणि न्याय्य मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान हा कोणत्याही राजकीय भूमिकेपेक्षा अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक आहेत. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. विद्यार्थ्यांनीही आपली बाजू समितीसमोर मांडून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे,” असे आवाहन डावखरे यांनी केले.