Wednesday, October 28 2026 11:43 pm

बळीराजाच्या श्रमाला अधिकाऱ्याची दाद! अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी घेतला भातकापणीचा प्रत्यक्ष अनुभव

शहापूर तालुक्यातील पीक परिस्थिती, विकासकामे आणि कृषी उपक्रमांची केली पाहणी

शहापूर, 28 : शहापूर तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी आणि कृषी विभागाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार अजिंक्य पवार यांनी आज तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतात उतरून शेतकऱ्यांसमवेत भातकापणी व झोडणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्यांनी बळीराजाच्या श्रमाचे कौतुक केले.

कृषी विभाग व पंचायत समिती, शहापूर यांच्या विद्यमाने मौजे शेणवे येथे आयोजित शेतकरी शिबिरात पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समितीच्या सेस फंडातून लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या ताडपत्रींची त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्यात आली.

यानंतर मौजे लवले येथे भेट देऊन त्यांनी वरई व भात पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. भात पीक पर्यवेक्षणादरम्यान त्यांनी स्वतः हातात विळा घेऊन शेतकऱ्यांसोबत भातकापणी केली, तसेच भात झोडणीचाही अनुभव घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्याने शेतात उतरून शेतकऱ्यांच्या कामात सहभाग घेतल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या दौऱ्यात लवले ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल योजनांची कामे, आरोग्य उपकेंद्र आणि अंगणवाडीच्या बांधकामाचीही पाहणी करण्यात आली. संबंधित कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत ठुणे येथे भेट देऊन तालुकास्तरीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

या दौऱ्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबू राठोड, कृषी अधिकारी विलास झुंजारराव, विस्तार अधिकारी (कृषी) दिनेश घोलप, सचिन गंगावणे, ललित बडगुजर, ग्रामविकास अधिकारी योगेश हरड यांच्यासह ग्रामीण गृहनिर्माण अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते.