Tuesday, August 18 2026 12:12 pm

अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा-आ. संजय केळकर..

थकबाकीदार बिल्डर मोकाट; सर्वसामान्यांवर वाढीव कराचा बोजा..

ठाणे 18 : शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडून मालमत्ता कराची कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांवर १२ टक्के करवाढ केली जाते. त्यामुळे आधी थकबाकी वसुली करा आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी मालमत्ता कर वाढविण्याच्या भूमिकेला विरोध केला. महापालिका प्रशासन १० वर्षांनी करवाढ करत असल्याचे म्हणत असले तरी यंदा होणारी करवाढ ही तिसऱ्यांदा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वैधानिक लेखपरीक्षणात २०१८मध्ये १७६ कोटी रुपयांची थकबाकी असून आतापर्यंत ६०० कोटींहून जास्त थकबाकी असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडे कोट्यवधींची मालमत्ता कर थकबाकी असून ती वसूल करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असताना सर्वसामान्यांवर मात्र १२टक्के मालमत्ता करवाढ करण्यात येत आहे. हा सर्वसामान्य करदात्यांवर अन्याय असून आधी थकबाकी वसूल करा आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती श्री.केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

खोपट येथे भाजप कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजुरी येथील एसआरए प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते. रहिवाशांची भाडी थकवण्यात येऊन त्यांना घरेही मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. याबाबत श्री. केळकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर विकासकाने रहिवाशांच्या इमारतीचे बांधकाम चालू असून त्यांना लवकरच घरे देण्यात येतील असे कबुल केले, तसेच रहिवाशांना भाडी देण्यास सुरुवात केल्याचेही विकासकाने स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे.

वाहतूक वॉर्डन चार महिने पगाराविना

शहरात वाहतूक शाखेला मदत करणाऱ्या सुमारे १५० वॉर्डन कर्मचाऱ्यांना गेले चार महिने पगार देण्यात आलेला नसून कंत्राटदाराने किमान वेतन, विमा, इतर सुविधा याबाबत कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली असून संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून दोन दिवसांत वॉर्डनचे पगार देण्यात यावेत, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

अतिक्रमणाबाबत तक्रारींचा ढीग वाढत असून अनधिकृत मजलेही चढत आहेत. आयुक्तांनी संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी करत आमदार केळकर यांनी लवकरच ज्या ज्या सहायक आयुक्तांनी मोठे पराक्रम केले आहेत, त्यांची नावे समोर आणणार असल्याचा इशारा दिला.