Thursday, August 6 2026 2:27 am

‘पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान खपवून घेणार नाही’-काँग्रेसवर एकनाथ शिंदेंचा घणाघात

सुनेत्रा पवारांवरील टिप्पणी म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा अवमान; २०२४ चा धडा काँग्रेस विसरली का?

“जनाची तरी लाज बाळगा’; सुनेत्रा पवारांवरील टिप्पणीवर उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला सुनावले.”

मुंबई, 05 : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ” महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान आहे. काँग्रेसने निदान जनाची तरी बाळगायला हवी होती,” असा घणाघात शिंदे यांनी केला.

पद्मश्री, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला.

“महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा आज खरा चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. राजकीय विरोध करा, पण महिलांचा अपमान करून राजकारण करण्याची ही काँग्रेसची संस्कृती आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिंदे पुढे म्हणाले, “सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करण्याच्या नादात काँग्रेसने संपूर्ण महिला शक्तीचाच अवमान केला आहे. हा अपमान महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही विसरणार नाहीत. महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात अशा प्रकारची भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.”

यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. “२०२४ मध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी काँग्रेसला लोकशाही मार्गाने उत्तर दिले होते. महिलांचा अपमान करणाऱ्यांना पुन्हा एकदा जनताच धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसने राजकीय विरोध करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून, महिलांचा अपमान करणारी भाषा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असा जोरदार संदेश देत शिंदे यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली.