Thursday, August 6 2026 2:29 am

सिनेमागृहांना भाजपचा दणका; ‘भुतम् भयम्’ ला प्राईम टाईम

ठाणे 05 : ‘भुतम् भयम्’ या मराठी चित्रपटाला सापत्न वागणूक देणाऱ्या ठाण्यातील मॉलमधील चित्रपटगृहांना भाजपने चांगलाच दणका दिला असून आमदार संजय केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर या चित्रपटाला प्राईम टाईम देण्यात आला आहे.

सोमवारी झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ‘भुतम् भयम्’ या चित्रपटाची टीम उपस्थित होती. या टीमने आमदार संजय केळकर यांच्याकडे मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याबाबत तक्रार केली. रात्रीचा एखादा शो मिळत असल्याने मराठी रसिकांना हा चित्रपट पाहायला मिळत नाही. काही चित्रपटगृहांनी दोन दिवस चित्रपट लावून नंतर शो बंद केल्याने रसिकांची निराशा झाली आहे.

कलाकारांची व्यथा ऐकल्यानंतर श्री.केळकर यांनी सर्व चित्रपटगृहांना पत्रे दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या युवा मोर्चाचे सुरज दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत सर्व चित्रपटगृहांच्या मालकांची भेट घेतली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर मॉलमधील सर्वच चित्रपटगृहांनी नमते घेत या चित्रपटाला प्राईम टाईम देण्याचे मान्य केले. सध्या विवियाना, कोरम, सिनेवंडर, इटर्निटी, हाय स्ट्रीट आणि हिरानंदानी येथील देवगण चित्रपट गृहात हा चित्रपट सुरू असून मराठी रसिकांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले.

याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, ‘भुतम् भयम्’ या मराठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ नवीन आणि तरुण असून त्यांनी माझी भेट घेऊन व्यथा मांडली होती. मी चित्रपट गृहांना पत्रे दिली असून युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धडक देत पक्षाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात आणि ठाण्यात मराठी चित्रपटांवर अन्याय खपवून घेणार नाही, त्यांना प्राईम टाईम मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आम्ही मांडली आहे. आता भुतम् भयम्’ या चित्रपटाला प्राईम टाईम मिळाला असून मराठी चित्रपट रसिकांना दिलासा मिळाला आहे.