Wednesday, July 8 2026 3:39 pm

महालक्ष्मी क्लस्टर पुनर्विकासातील पुनर्वसनाबाबत महिनाभरात निर्णय – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 08 : महालक्ष्मी येथील आर्थर रोड परिसरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढील एका महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य सुनिल शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, संबंधित १५ व्यक्ती हे तेथील मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसेच ते किती वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहेत, याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कामगारांसाठी सुमारे ३ हजार घरे उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील.