..
लाभार्थ्याना तीन वर्षांतच हक्काचे घरकुल मिळणार
अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासकांनी केली भूमिका स्पष्ट
ठाणे, ०७ – अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ वरील एसआरए पुनर्विकास प्रकल्पाविरोधात करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून, विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी केला. प्रकल्पात लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि धार्मिक स्थळाची मोफत उभारणी करण्यात येणार असल्याचाही दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला विकासक फैजल अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम व सहपरिवर्तक उपस्थित होते.
ठाण्याच्या लुईसवाडी, काजुवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ मधील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप-प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. या झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पात १७१ पात्र झोपडीधारक आणि एक मंदिर असे एकूण १७२ लाभार्थी आहेत. साऊथ फिल्ड रिॲल्टी एलएलपी या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि एसआरएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसहमतीने करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून, उर्वरित भाड्याचे धनादेश एसआरए प्राधिकरणाकडे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे भाड्याबाबत विकासका विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केला.
दरम्यान, आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील २६ झोपडीधारकांनी घरे रिकामी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात एसआरएच्या कलम ३३/३८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली. संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे तब्बल सहा महिन्यांचा विलंब झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसुन स्थगिती आदेशही (स्टे) मिळवलेला नाही. तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, त्याचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करून अशोक वैती यांनी, “धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या प्रकल्पावर शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत, त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तर, पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर एसआरए प्रकल्पांबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत वैती म्हणाले की, काही प्रकल्पांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी असू शकतात; मात्र अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय झालेला नाही. तरीही दिशाभूल करणारे आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आरोप केल्यास संबंधितांविरोधात प्रशासकीय कार्यवाही तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अशोक वैती यांना पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी संस्थेचे सहप्रवर्तक सिताराम कांबळे यांनीदेखील विकासकाविरोधात संस्थेची आणि रहिवाश्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.
