पुणे, 07: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, पाणी साचणे, भूस्खलन आणि आग यांसारख्या आपत्कालीन घटना घडत असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) संकटमोचक ठरत आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव, लोणी काळभोर आदी भागांत बचाव पथकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले असून, अनेक ठिकाणी शोध व बचाव मोहिमा अद्याप सुरू आहेत.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, भूस्खलनाच्या घटनांमध्ये शोधकार्य करणे तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने मदत पोहोचविणे, अशा विविध कारवाया युद्धपातळीवर सुरू आहेत.
लोणावळ्यातील ग्रीन लँड व्हिला येथे पाण्यात अडकलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. कार्ले येथील माऊंट वेस्ट क्रिस्टा सोसायटीमध्ये पाण्याने वेढलेल्या २१ नागरिकांची लाइफ जॅकेट, लाइफ रिंग आणि दोरांच्या साहाय्याने सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात अडकलेल्या तीन नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
लोहगाव येथील आदर्श नगर परिसरात पाण्यात अडकलेल्या प्रवासी बसमधील १० ते १२ प्रवाशांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. मळवली येथील सूर्य व्हिला परिसरात पाण्याने वेढलेल्या २० नागरिकांसह एका पाळीव कुत्र्यालाही सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. तसेच मळवली-बोरज रोडवरील अंकित ग्रुप सोसायटीमध्ये अडकलेल्या १५ नागरिकांची, तर वाकसाई येथील वालोसिटी व्हिला, मँगो व्हिला आणि ओरिकल व्हिला परिसरातील तब्बल ३४ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
खेड तालुक्यातील रेटवडी येथे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून, शेलू येथे बुडालेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. तसेच लोणावळ्यातील नॉर्थ पॉईंट आणि श्री सिक्स्टी रिसॉर्ट परिसरात झालेल्या भूस्खलनानंतर काही व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने तेथेही शोध व बचाव मोहीम सुरू आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने ‘पीएमआरडीए’ने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत असून, आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात अथवा नदीकाठी जाणे टाळावे, सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संकटाच्या या काळात ‘पीएमआरडीए’चे अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक सातत्याने कार्यरत असून, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य मानत बचावकार्य अविरत सुरू ठेवले आहे.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, “अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’चे अग्निशमन दल आणि ‘पीडीआरएफ’चे अधिकारी व जवान अत्यंत तत्परतेने आणि समन्वयाने कार्य करत आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, प्रत्येक आपत्कालीन घटनेला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार बचाव पथकांना सहकार्य करावे.”
