Saturday, July 4 2026 2:10 pm
latest

अमरावती आदिवासी विकास विभागात अपर आयुक्तांची नियमित नियुक्ती – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

कल्याणकारी योजनांना मिळणार गती
मुंबई, 03: अमरावती येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तपदी नियमित स्वरूपात नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे विभागाच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत सदस्य रामदास मसराम यांनी अमरावती आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य राजेंद्र गावित, राजू तोडसाम, बाबा आत्राम आणि सुलभा खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, अपर आयुक्त पद रिक्त असताना काही काळ प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत कामकाज सुरू होते. मात्र, त्यामुळे विभागाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा आला नाही. विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले असून, गट ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पदोन्नती आणि सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाहीही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.