मुंबई, 03 : ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो (सर्क्युलर मेट्रो) प्रकल्पामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची पूर्ण काळजी घेण्यात आली असून प्रकल्पाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी एका महिन्याच्या आत स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी आणि मेट्रो प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी याबाबत सूचना मांडली. चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनीही सहभाग घेतला. या चर्चेस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, ठाण्यातील बहुतांश रस्ते ६, ९, १२ आणि १८ मीटर रुंदीचे असून २४ मीटर रुंदीचे रस्ते अत्यल्प आहेत. विद्यमान ६ व ९ मीटर रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागल्यास मोठ्या प्रमाणात विस्थापन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास न होता वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड आणि वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. वर्तुळाकार मेट्रोची लांबी २९ किलोमीटर असून त्यात २२ स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना वाहतूक नियोजन, विविध भागांवरील परिणाम, स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि तज्ज्ञांचा सल्ला यांचा विचार करण्यात आला आहे.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना मेट्रो प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो प्रशासनासोबत बैठक आयोजित करावी, अशा सूचना दिल्या जातील. प्रकल्पाबाबत अनावश्यक गैरसमज पसरवू नयेत. हा ठाणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्योन्मुख प्रकल्प आहे. सध्या प्रकल्पाची सुमारे ९ टक्के कामे पूर्ण झाली असून पुढील कामांनाही गती मिळाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
