Wednesday, August 26 2026 9:04 pm

अंधेरी ईएसआयसी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्ट; कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 30 : कामगारांसाठी असलेल्या राज्य कामगार विमा (ईएसआयसी) रुग्णालयांमध्ये विमाधारक कामगारांना मोफत उपचार दिले जातात, तर इतर पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जास्तीत जास्त नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी रुग्णालयाचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली.

अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालयाच्या दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्बांधणीसंदर्भात सदस्य मुरजी पटेल यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी सदस्य अमीन पटेल, अर्जुन खोतकर, महेश सावंत आणि अशोक पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, सर्व धर्मदाय रूग्णालयात योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या रूग्णांसाठी किती जागा उपलब्ध असल्याबाबतची माहिती रूग्णालयांच्या दर्शनी भागात माहिती फलकावर लावण्यात येते. तसे, नसल्यास त्यासंदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. तसेच अंधेरी पूर्व येथील रूग्णालय तातडीने पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्यात येतील. सेव्हन हिल्स रूग्णालयाच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यास आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्यमंत्री म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली राज्य कामगार विमा महामंडळामार्फत राज्य कामगार विमा योजना राबविण्यात येत असून राज्यात एकूण १५ रुग्णालयांद्वारे विमाधारक व लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवा दिली जाते. अंधेरी परिसरात ३० हजार ९७८ नोंदणीकृत नियोक्ते, ४ लाख ९३७ विमाधारक आणि सुमारे १६ लाख लाभार्थी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, डिसेंबर २०१८ मध्ये लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाच्या आंतररुग्ण सेवा तात्पुरत्या स्वरूपात कांदिवली येथील रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आल्या होत्या.

रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडमार्फत सुरू असून बाह्यरुग्ण विभाग १४ ऑगस्ट २०२३ पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. यासाठी केंद्रीय कामगार मंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे. सध्या शस्त्रक्रिया विभाग आणि डी-विंगचा काही भाग हस्तांतरित झाला असून उर्वरित दुरुस्ती, नूतनीकरण व श्रेणीसुधारणा कामे सुरू आहेत. गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर आंतररुग्ण, आपत्कालीन, निदान व इतर विशेष वैद्यकीय सेवा टप्प्याटप्याने सुरू करून रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे.