Thursday, June 25 2026 4:02 pm
latest

गृह, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून रुग्णवाहिका उपलब्ध करणार – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, 25 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वाहन दरीत कोसळून आठ व्यक्तींचा मृत्यू झाला. पोलीस पंचनाम्यानुसार हा अपघात वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे घडला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील रस्त्याची कामे IRC (Indian Roads Congress) च्या नियमांनुसार सुरू असून, गृह विभाग, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयातून ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.

कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबेनळी घाटासंदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी सदस्य अस्लम शेख आणि सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते कुंभरोशी या राज्य महामार्गावरील एकूण २४.२ किलोमीटर रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हायब्रीड ॲन्युइटी योजनेअंतर्गत प्रगतीपथावर आहे. यापैकी १४ किलोमीटर लांबीच्या ५.५० मीटर रुंदीच्या विद्यमान रस्त्याचे ७.० मीटर रुंदीच्या डांबरीकरणात रूपांतर करण्यात येत असून, दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.५० मीटर रुंदीच्या बाजूपट्ट्यांची सुविधा दिली जात आहे. तसेच उर्वरित सुमारे १० किलोमीटर लांबीच्या ५.५० ते ७.० मीटर रुंदीच्या रस्त्याचे १०.० मीटर रुंदीचे डांबरीकरण, दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.० मीटर रुंदीच्या बाजूपट्ट्यांसह करण्यात येत आहे.

तसेच कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गावर ७.० मीटर रुंदीचे डांबरीकरण तसेच दोन्ही बाजूंना प्रत्येकी १.५० मीटर रुंदीच्या बाजूपट्ट्या विकसित करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ही कामे प्रगतीपथावर असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत राहावा, यासाठी रस्त्यावरील खड्डे वेळोवेळी डांबरीकरणाद्वारे भरून दुरुस्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. आंबेनळी घाटातील अपघातस्थळाजवळ रस्त्याची रुंदी सुमारे १४ मीटर असून, रस्त्याच्या कडेला अँटी क्रश बॅरियर, सुरक्षा कठडे, माहिती व दिशादर्शक फलक आदी सुरक्षा साधने स्थापित करण्यात आली आहेत.

पोलादपूर–महाबळेश्वर या प्रगतीपथावरील रस्ते प्रकल्पामध्ये रस्ते सुरक्षा उपाययोजना, अँटी क्रश बॅरियर आणि सुरक्षा कठडे उभारणे, रोड मार्किंग व पेंटिंग करणे तसेच दिशादर्शक फलक बसविणे आदी बाबींचा समावेश आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. रोड मार्किंग, पेंटिंग आणि दिशादर्शक फलक हे प्रकाश परावर्तित स्वरूपाचे असल्याने रात्रीच्या वेळी, विशेषतः उंचसखल आणि वळणदार रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी मदत होते, अशी माहितीही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.