Wednesday, June 24 2026 3:06 pm

दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ‘सहकार पॅनल’च जिंकणार

ठाणे 24 :- दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या २७ तारखेला होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, माननीय हितेंद्रजी ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि आमदार किसनराव कथोरे यांच्या नेतृत्वाखालील आपले सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’ निवडणूक रिंगणात असून आहे. ‘सहकार पॅनलला मिळणारा प्रतिसाद पाहून शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचे कुभांड विरोधक रचत असून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका’, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदांपैकी १० जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध आलेले १० पैकी ८ संचालक हे आपल्या ‘सहकार पॅनल’चे आहेत! बँकेत सहकार पॅनलला स्पष्ट बहुमतासाठी उर्वरित ११ जागांपैकी फक्त ३ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. परंतु, सहकार पॅनल फक्त ३ नाही, तर सर्वच्या सर्व ११ जागा जिंकून बँकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवेल, अशी खात्री सहकार पॅनलला आहे.

‘पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळे विरोधी पक्षातील काही नेते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ते शिवसेनेचा पाठिंबा त्यांनाच असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. तसे व्हिडीओ सोशल मीडिया आणि अन्य प्रसिद्धी माध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. मात्र, हा सारा बनाव असून मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये’, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘निवडून आलेले हे सहकार पॅनल भविष्यात बँकेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सर्व सभासदांच्या भरभराटीसाठी एकाच ध्येयाने आणि एकदिलाने काम करेल’, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

‘सर्वपक्षीय सहकार पॅनल’च्या अधिकृत उमेदवारांची नावे माहितीसाठी सोबत देत असून त्यांच्या विजयाची शिवसेनेला खात्री आहे. सहकार पॅनलच्या अधिकृत उमेदवारांचे अधिकृत निवडणूक चिन्ह शिट्टी आहे.
• रंभाजी बारकु जगताप (गृहनिर्माण व इतर संस्था)
• विशाल भाऊ कुऱ्हाडे (पगारदार सेवकांच्या सह. पतसंस्था, नागरी सहकारी संस्था)
• स्वप्नील अनिल मुंबईकर (इतर मागासवर्गातील सदस्य)
• बळीराम सुकूर जाधव (अनुसूचित जाती/जमाती)
• निवृत्ती यशवंत घुमेकर (विमुक्त भटक्या जमाती)
• निता राजेंद्र कांबळी (महिला प्रतिनिधी)
• स्मिता रवींद्र घोडविंदे (महिला प्रतिनिधी)
• प्रकाश नारायण वरकुटे (शहापूर – विविध सहकारी सेवा)
• नागेश गजानन पाटील (पालघर – विविध सहकारी सेवा)