आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा बालकांशी संवाद; क्रीडा संस्कार व वाचन संस्कृतीला चालना
ठाणे, 24: महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कल्याण ग्रामीण, रिलायन्स फाउंडेशन टीम आणि प्रथम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रायते अंगणवाडी, कल्याण येथे ऑलिम्पिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या ॲथलिट खेळाडू मौमिता मंडल आणि सोनिया भासिया यांनी उपस्थित राहून बालकांसोबत विविध खेळ खेळले तसेच त्यांच्याशी संवाद साधून क्रीडा क्षेत्रातील अनुभव सांगितले.
कार्यक्रमादरम्यान बालकांमध्ये खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा तसेच लहान वयातच क्रीडासंस्कार रुजावेत या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मौमिता मंडल आणि सोनिया भासिया यांनी बालकांना नियमित व्यायाम, खेळ आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. खेळामुळे आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास बाल विकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पर्यवेक्षिका उषा लांडगे, प्रथम संस्थेच्या प्रतिनिधी हेमलता सासणे, रायते ग्रामपंचायतीच्या सरपंच समिता संतोष सुरोशी तसेच रिलायन्स फाउंडेशनचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रथम संस्थेच्या वतीने बालकांना विविध प्रकारची पुस्तके भेट देण्यात आली. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, कल्पनाशक्ती आणि ज्ञानवृद्धी व्हावी या उद्देशाने पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच बालकांना विविध खेळांची माहिती देऊन त्यांचा प्रत्यक्ष सहभागही घेण्यात आला.
रायते ग्रामपंचायतीच्या सरपंच समिता संतोष सुरोशी यांनी अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील बालकांना प्रेरणा मिळते तसेच त्यांच्यामध्ये क्रीडा आणि शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे सांगितले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्षय यादव यांनीही कार्यक्रमास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बाल विकास विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खेळ, संवाद, पुस्तक वाटप आणि विविध मनोरंजक उपक्रमांमुळे ऑलिम्पिक दिनाचा उत्सव संस्मरणीय ठरला. बालकांमध्ये क्रीडा, वाचन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
