Wednesday, June 24 2026 2:48 pm

छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत १० कोटी रुपये देण्यात येणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, 24 : छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य अनिल परब, अंबादास दानवे, चित्रा वाघ यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. त्यास उत्तर देताना सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळाची नेमणूक; तसेच अन्य आवश्यक कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल.