Tuesday, June 2 2026 2:52 am

सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे-अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे 01 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे हिंदुत्व हे कुठल्याही अहिंदूंचे नुकसान करणारे नाही. त्यांचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकर आणि त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत, असे स्पष्ट मत अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक असलेल्या स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान सहयोग मंदिरात आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “सावरकर एक तत्त्व आहेत. ताठ मानेने, स्वाभिमानाने देशासाठी आणि धर्मासाठी कसे जगावे हे त्यांनी शिकवले. आज त्यांचा पक्ष किंवा अनुयायी शिल्लक नसले तरी काँग्रेसला दर दोन दिवसांनी स्वप्नात सावरकर येतात, ही त्यांची भीती आहे. समाजसुधारक, महाकवी, क्रांतिकारक आणि माणुसकीचे तत्त्व शिकवणारे म्हणून सावरकरांना एकट्याने अनेक भारतरत्न द्यावे लागतील, म्हणून सरकार त्यांना भारतरत्न देत नाही.”

शरद पोंक्षे पुढे म्हणाले, “सावरकरांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. कुठल्याही अहिंदूंचे नुकसान करणारे सावरकरांचे हिंदुत्व नाही. शंभर टक्के नास्तिक होण्याची परवानगी या हिंदू सनातनी धर्मात आहे, हे याचे सौंदर्य आहे. म्हणूनच हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला हवे.”
सेक्युलरिझम, निधर्मवाद आणि सर्वधर्मसमभाव या तीन रोगांतून हिंदू समाज जेव्हा बाहेर पडेल, तेव्हाच हिंदूंचे खरे कल्याण होईल. हिंदू धर्म टिकवणे हे प्रत्येक हिंदूचे नैतिक कर्तव्य आहे. या देशात राहून हिंदुस्थानचा पाकिस्तान बनवण्याचा विचार करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी काय वस्तू कुठून विकत घ्यायची, हे हिंदूंनी ठरवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘हर घर सावरकर’ मोहीम अधिक व्यापक करणार

राजकीय कार्यात प्रचंड व्यस्त असतानाही सामाजिक भान विसरले नाहीत, अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हर घर सावरकर’ योजना राज्यभरात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे सावरकरांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवणार असल्याचे शरद पोंक्षे यांनी सांगितले.