Thursday, May 28 2026 11:17 pm
latest

कोलशेत आणि शिवाईनगरमधील म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी

कोलशेत आणि शिवाईनगरमधील म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी

* आमदार संजय केळकर यांचा पुढाकार
* म्हाडा अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक

ठाणे 28 : कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचे ले आउट, आणि लीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ आदी प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री. केळकर यांच्या स्पष्ट सूचनांनंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

आज झालेल्या बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी श्री. राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे २०० रहिवासी उपस्थित होते.

कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दराने फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली. रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या इमारतींचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीने करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही आ. केळकर यांनी केली.

शिवाई नगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करत आहेत. अकृषिक कर रद्द होऊनही त्याची अवास्तव बिले पाठवण्यात आल्याने भाडे कराराची प्रक्रिया रखडलेली आहे. अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवड्याभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तत्काळ भाडेकराराची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही श्री. केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्या. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिवाई नगरमधील रहिवाशांचा भाडेकरार करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच याविषयी सर्व सोसायट्यांना त्यांनी भाडेकरार करण्यापूर्वी किती रक्कम भरायची आहे व कशाप्रकारे भरायची आहे याची संपूर्ण माहिती पुढच्या आठवड्याभरात देऊन त्यांचे भाडेकरार तत्काळ करण्यात येतील, असे आश्वासन कार्यकारी अधिकारी राठोड यांनी दिले आहेत.