Saturday, April 25 2026 5:21 pm

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

ठाणे, 25 : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौऱ्यास मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. हा शुभेच्छा समारंभ दिनांक २७ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘मिशन भरारी’ या उपक्रमाचे औपचारिक अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून दि. २६ जानेवारी, २०२६ रोजी करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दि. २७ एप्रिल २०२६ ते १ मे २०२६ या कालावधीत देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हा अभ्यासदौरा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे मार्गदर्शनातून राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक /वैज्ञानिक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घ्यावे, तसेच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या अभ्यासदौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून सातत्याने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असून ‘मिशन भरारी’ हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळणार असून तिरुअनंतपुरम व कन्याकुमारी येथील विविध वैज्ञानिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन, केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम व प्रियदर्शिनी प्लॅनेटेरियम यांसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद स्मारक, थिरुवल्लुवर पुतळा व इतर पर्यटन स्थळांनाही भेट दिली जाणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान व आधुनिक प्रयोगशाळांचा प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर व अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

‘मिशन भरारी’ अंतर्गत सन २०२५-२६ या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात अंबरनाथ तालुक्यातून १६ विद्यार्थी (मराठी माध्यम १२ व उर्दू माध्यम ४), भिवंडी तालुक्यातून १२ विद्यार्थी (मराठी माध्यम ११ व उर्दू माध्यम १), कल्याण तालुक्यातून १० विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम), मुरबाड तालुक्यातून १० विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम) तसेच शहापूर तालुक्यातून ११ विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम) यांचा समावेश आहे. एकूण निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थी मराठी माध्यमातील (२५ मुले व २९ मुली) तर ५ विद्यार्थी उर्दू माध्यमातील (२ मुले व ३ मुली) आहेत. अशा प्रकारे एकूण २७ मुले व ३२ मुलींचा समावेश असलेला ५९ विद्यार्थ्यांचा गट या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी सहभागी होणार आहे.

“‘मिशन भरारी’ हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे दालन उघडणारा आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्यांच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सहलीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, तुमची ही भरारी भविष्यात मोठ्या यशाकडे नेणारी ठरो,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.