Thursday, April 2 2026 7:26 pm

साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, 02 : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, या योजनेमुळे ३२ गावांतील सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या व मान्यता वेळोवेळी बैठका घेऊन मिळविण्यात आल्या. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले साकळाई योजनेचे स्वप्न पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे.

या योजनेअंतर्गत म्हसेगाव येथून चार टप्प्यांमध्ये पाणी उपसा करून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांमध्ये विकेंद्रित जलसाठ्यांद्वारे पाणी पुरविण्यात येणार आहे. यामध्ये अस्तित्वातील लघुपाटबंधारे तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच गाव तलावांचा समावेश आहे. सिंचनासाठी १.६० टीएमसी व पिण्यासाठी ०.२० टीएमसी असा एकूण १.८० टीएमसी पाणी वापर नियोजित करण्यात आला आहे.

या योजनेत घोड धरणाच्या जलाशयातून मौजे म्हसे येथे पंपगृह क्रमांक १ उभारण्यात येणार असून, पंपगृह क्रमांक १ ते ४ आणि वितरण कुंड क्रमांक १, २ व ३ यांच्या माध्यमातून चार टप्प्यांमध्ये सुमारे २०८.३४ मीटर उंचीपर्यंत पाणी उचलण्यात येणार आहे. हे पाणी चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडण्यात येईल. त्यानंतर गुरुत्वीय बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे लाभक्षेत्रातील ३२ गावांतील सुमारे १९६ तलावांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी देखील दीर्घकाळ पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे योजनेच्या सर्व टप्प्यांना गती मिळाली आहे असे, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.