Wednesday, April 1 2026 1:05 pm

सन 2025 करिता विविध कृषी पुरस्कारासाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

 

ठाणे, 01 :- महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार राज्यपालांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते.
यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी व आवश्यक कागदपत्र जमा करणेसाठी होणारा त्रास व लागणारा खर्च यामुळे सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण,पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.
या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.
तरी इच्छुक शेतकरी/व्यक्ती/संस्था/गट यांना सन 2025 करिता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2026 होती. परंतु ऑनलाईन प्रणालीचे पहिलेच वर्ष तसेच शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास लागणारा कालावधी या कारणास्तव काही अर्ज शेतकरी स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शेतकरी स्तरावरून व क्षेत्रीय स्तरावरून याची मुदत वाढवून मिळण्याबाबत होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने सन 2025 करीता विविध कृषी पुरस्कारबाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्यास कृषी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आलेली असून अंतिम मुदत दि.15 एप्रिल 2026 करण्यात येत आहे.
तरी इच्छुक शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करण्याबाबत कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.