- जागेचे व्यापारीकरण होणार नाही
मुंबई, 11 : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्यात येत असून या प्रकल्पाच्या जागेचे व्यापारीकरण होणार नसल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सचिन अहिर यांनी याविषयी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सतेज पाटील, अनिल परब यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात अमेरिकेतील किंवा लंडनमधील प्रसिद्ध उद्यानांपेक्षाही अधिक आकर्षक आणि जगभरातील पर्यटकांनी आकर्षित करणारे असे उद्यान उभे राहावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मते विचारात घेतली जाणार आहेत. स्थानिक आमदारांकडून प्राप्त लेखी सूचनांचा अभ्यास करून त्यातील योग्य बाबींचा समावेश केला जाईल.
सेंट्रल पार्कच्या आराखड्याची मुंबईतील सर्व आमदारांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली जाईल, असे सांगत मंत्री उदय सामंत म्हणाले या सेंट्रल पार्कचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ घेता येईल.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे सांगत झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
