Saturday, March 7 2026 6:30 pm

पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 07 : राज्याच्या २०२६- २७  च्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून महाराष्ट्रातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

मंत्री देसाई म्हणाले की, २०४७ पर्यंत राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वार्षिक १६ कोटींवरून ३८ कोटींपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दृष्टीने राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील निवडक ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची गुणवत्ता वाढेल आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.

सातारा जिल्ह्यातील मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून या प्रकल्पामुळे सह्याद्रीतील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नवगाव येथे  चित्रनगरी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामटेक येथे रामसृष्टी आणि कालिदास स्मृती उभारण्यात येणार असून महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य देण्यात येणार आहे. यामुळे सांस्कृतिक आणि चित्रपट पर्यटनाला चालना मिळेल, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.

महानुभाव पंथाशी संबंधित विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्यात येणार असून धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे.

या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढेल आणि महाराष्ट्र जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.