Sunday, February 15 2026 8:57 pm

ठाण्यातील मालवणी महोत्सवात साहित्य संमेलनाची सांगता

 

कवी संमेलनात ३८ कवींची जुगलबंदी; ‘मातोश्री कै. यमुनाबाई बाजी राणे’ पुरस्कारांचे वितरण

ठाणे, 14 – कोकण ग्राम विकास मंडळ यांच्या वतीने आणि भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने उभारलेल्या कलादालनात दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनाची सांगता काव्य वाचनाने झाली. या कवी संमेलनात तब्बल ३८ स्पर्धक कवींनी सहभाग घेत काव्यवाचनाची देखणी जुगलबंदी सादर केली.
ठाण्याच्या शिवाईनगर, उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष आहे. महोत्सवात कवीवर्य मंगेश पाडगावकर कलादालनात शुक्रवारी (ता.१३ फेब्रु.) सायंकाळी काव्यधारा बरसल्या. महाविद्यालयीन विद्यार्थिनी संज्योत ढवळे हिने स्वरचित कवितेद्वारे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील दिग्गज कवीवर्यांचा उल्लेख असलेल्या कवितेतुन अनोखी कवितांजली वाहिली. ‘सखे गं बाई’ या कवितेतून एकनाथ शेडगे यांनी स्वतः अनुभवलेल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. जयेश मोरे यांनी ‘नको मोगरा किंवा चाफा’ सादर केली, तर वयोवृद्ध नवोदित कवी मनमोहन रोगे यांनी ‘शुभ-अशुभ’ ह्या काव्यातुन अंधश्रद्धेवर प्रहार केले. रूपाली महाजन हिने नव्या जमान्यातील कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. साहित्यिका प्रज्ञा पंडित यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर लेखक अनिल कालेकर, रश्मी जोशी आणि कवयित्री ज्योती शहाणे हे काव्य वाचन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमात ‘मातोश्री कै. यमुनाबाई बाजी राणे’ पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना नगरसेवक सीताराम राणे म्हणाले, “माझी आई यमुनाबाई राणे ही जरी शिक्षित नव्हती, तरी तिच्या संस्कारांमुळे आम्ही घडलो. त्या संस्कारक्षम पिढीची जडणघडण व्हावी, या हेतूने गेली १७ वर्षे या महोत्सवात आईच्या नावाने पारितोषिके देत आहोत. दरवर्षी काव्य संमेलन घेतोच; मात्र यंदा साहित्य संमेलनाची नवी रुजवात केली आहे. भविष्यात भव्य संमेलने भरवुन साहित्यिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न राहील.” असे आश्वासित केले.

चौकट : दृष्टीबाधित विद्यार्थ्याच्या सुरांनी जिंकली मने

बदलापूर येथील दृष्टीबाधीत विद्यार्थी शुभम घनघाव याने आपल्या गायन कलेचा अप्रतिम अविष्कार सादर करत पंढरपूर येथील विठुरायाचे गीत गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. अंधत्वावर मात करीत नेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या शुभमचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कोकण ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे यांच्या हस्ते त्याचा गौरव झाला. शुभमच्या सुमधुर गीताने भारावून दानतपस्वी अनुश्री भिडे, संतोष बाजी राणे यांसह अनेक रसिकांनी त्याला रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले.

पुरस्कार विजेते

जीवनगौरव : दानतपस्वी अनुश्री भिडे
साहित्य गौरव : मनिषा गोखले
साहित्य गौरव (शिक्षण क्षेत्र) : अनुराधा पाटील
साहित्य गौरव : निंबाजी वाघ, आकाशवाणीच्या निवेदिका साहित्यिका पौर्णिमा शिंदे, प्रभाकर मगर,
युवा गौरव : निष्ठा फडके, ‘चालता बोलता गुगल’ ओजस रानडे

काव्य लेखन स्पर्धेतील विजेते

भाग्यश्री पालये – प्रथम
राजेंद्र ठाकूर – द्वितीय
मृणालिनी हरकरे – तृतीय
मयुरी धुरी – उत्तेजनार्थ
ज्योती विटणकर – उत्तेजनार्थ