ठाणे, 06 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे नळ संयोजन धारक त्यांचे पाणी बिल प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा नळ संयोजन धारकांना सोयीचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व पाणी बिल वसुली काऊंटर कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र 31 मार्च 2026 पर्यत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
तसेच थकीत पाणी बिलावरील व्याज/ दंड १०० टक्के माफीची योजना लागु करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या चालू पाणी बिलाची थकबाकीसह रक्कम एक रक्कमी भरणा करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
दि.03.01.2026 ते दि. 31.03.2026 या कालावधी मधील सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (दि.03 मार्च, 2026 रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून) सकाळी 10.30 ते 4.30 तसेच सर्व रविवार सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत पाणी बिल वसुली करिता पाणी बिल वसुली काऊंटर, स्मार्ट मीटर बिल कार्यालय व मुख्य कार्यालयही कार्यान्वीत ठेवण्यात येणार आहेत.
सन 2025-26 या आर्थिक वर्षाची पाण्याचे देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्याकरिता महापालिकेच्या https://tmcswmb.co.in/ (For Smart Water Bill) and https://watertax.thanecity.gov.in/ (For Non Meter Water Bill) या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रभाग कार्यालयाकडील सर्व पाणी बिल वसुली काऊंटरवरही पाणी बिल देयके स्विकारली जातात असेही पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी नमूद केले.
