प्रकल्प प्रमुख आरती परब यांनी सादर केला सिग्नल शाळेवर प्रबंध
ठाणे, 06 – गेली एक दशक स्थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाणभाषा अवगत नसलेल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटा खुल्या करणाऱ्या सिग्नल शाळेच्या प्रयोगाचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मान झाला. श्रीलंकेत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत सिग्नल शाळेच्या प्रयोगावर आधारित प्रबंध सादर झाला. सिग्नल शाळेच्या प्रयोगाच्या सादरीकरणाने अशिया खंडातील शिक्षणातील प्रयोगशिलता अधोरेखीत झाली. परिषदेत सिग्नल शाळेचा प्रबंध मांडतांना तिरंगा झळकला आणि या तिरंग्याच्या साक्षीने जणू आंतरराष्ट्रीय पटलावर सिग्नल शाळेचा झेंडा फडकला. जगभरातील शिक्षण क्षेत्रातील पथदर्शी प्रयोगांवर आधारित शिक्षण परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. यंदाची शिक्षण परिषद श्रीलंकेत संपन्न झाली.
स्थलांतरीत, शाळाबाह्य, प्रमाणभाषा अवगत नसलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षांपुर्वी सुरू झालेल्या सिग्नल शाळेची निवड सादरीकरणासाठी झाली होती. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या या परिषदेत विविध देशातील पथदर्शी प्रयोगांचे सादरीकरण झाले. सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब यांनी सिग्नल शाळेवरील प्रबंध सादर केला. तसेच दहा वर्षे सिग्नल शाळेत अवलंबलेल्या प्रयोगशिल शिक्षणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन देखील या परिषदेत करण्यात आले.
स्थलांतर व शाळाबाह्य मुलांचे शिक्षण ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे. जगाच्या सर्वांगिण कल्याणासाठी सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळायला हवी यासाठी शिक्षण क्षेत्राने त्यांच्या चौकटी मोडून शाळेपर्यंत मुले नाही तर मुलांपर्यंत शाळा पोहचवायला हवी. समग्र शिक्षणासाठी लवचिक व प्रयोगशिल शैक्षणिक धोरणाचा जगाने अवलंब करायला हवा. परिषदेत सादर झालेले विविध प्रबंध हे त्या त्या प्रातांपुरते मर्यादित न राहता त्यांचा जगभरातील गरजवंतांसाठी उपयोग व्हायला हवा. यासाठी विश्वातील शिक्षणयोगींनी एकत्र येऊन अंतोदयासाठीचा यज्ञ आपापल्या प्रयोगशिल शिक्षणाच्या आहुत्या देवुन प्रज्वलीत करायला हवा असे आवाहन आरती परब यांनी यावेळी आपल्या प्रबंध सादरीकरणाच्या वेळी केले.
परिषदेत श्रीलंकेच्या युना प्रांताचे राज्यपाल जे एम कपीला जयशेखरा, युना प्रांताच्या मुख्य सचिव अनुषा गोरूला फर्नाडो, शिक्षण सचिव निहाल गुणरत्ने, अतिरिक्त संचालक शिक्षण जे एम सेनाधिरा, पेराडेनिया विदयापीठाचे वॉल्टर सेनेविरत्ने, सिपविन एज्युकेशन इंस्टीटयुटचे संस्थापक गुणपाला रत्नसेकरा, सी फॉर सिनर्जीच्या उषावती शेट्टी आदी मान्यवर व विविध देशातील शिक्षण विषयातील तज्ज्ञ उपस्थित होते.
श्रीलंकेतील कोलंबो व उना येथे १ ते ६ जानेवारी दरम्यान गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर आधारित ही शिक्षण परिषद संपन्न झाली. परिषदेच्या निमित्ताने श्रीलंकेतील विविध विद्यापीठांना भेटी, तेथील शैक्षणिक प्रयोगाची देवाणघेवाण व शिक्षण क्षेत्रातील मुलभुत संकल्पनाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयावर भर देण्यात आला. भारतातील सिग्नलवरील मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठीचा सिग्नल शाळेचा प्रयोग विविध अविकसित, विकसनशिल तसेच विकसित देशातील शाळाबाह्य मुलांसाठी संजिवनी ठरेल, असा विश्वास या परिषदेत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केला.
