मुंबई 17 – मुंबईच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणाऱ्या षण्मुखानंद नाट्यगृहाच्या धर्तीवर, सुमारे ३,००० प्रेक्षक क्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह ठाण्यातील घोडबंदर मार्गावर साकारले जाणार असल्याची ऐतिहासिक घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली. ठाण्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
घोडबंदर मार्गाचा झपाट्याने होत असलेला सर्वांगीण विकास आणि ‘जुळे ठाणे’ म्हणून आकार घेत असलेला परिसर पाहता, येथे दर्जेदार सांस्कृतिक केंद्र उभे राहणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले. महापालिकेच्या सुविधाभूखंडावर भव्य नाट्यगृह उभारण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह अधिकारीवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यानांचे सौंदर्यीकरण, क्रीडांगणांना नवी ऊर्जा
दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री सरनाईक यांच्या शुभहस्ते श्रीनिवास खळे संगीत उद्यान, नामदेवराव ढसाळ उद्यान तसेच नुतनीकरण केलेल्या १२ उद्यानांचे लोकार्पण करण्यात आले. या उद्यानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, सार्वजनिक प्रसाधनगृहे, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके, तसेच खुली व्यायामशाळा अशा बहुपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय लोकमान्य पाडा क्र. १ महिला बचत भवन, स्वामी विवेकानंद चिल्ड्रन्स पार्क, आनंद नगर येथील सरस्वती शाळेजवळील खेळाचे मैदान आणि कासारवडवली पोलीस स्टेशनजवळील जागा येथे फुटबॉल टर्फ उभारणीचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
चौकट
संस्कृती, क्रीडा आणि सार्वजनिक सुविधांचा समन्वय साधत, घोडबंदर रोडवरील हे प्रस्तावित नाट्यगृह ठाण्याच्या सांस्कृतिक नकाशावर नवे तेजस्वी दालन उघडणार—असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
