केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले सूचनेचे स्वागत
भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत
नवी दिल्ली 17 – देशात उत्पादन केलेल्या वस्तूंची पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क विकसित केले जात असून ठाणे जिल्ह्याचा यात समावेश आहे का ? असा थेट सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला. हे पार्क पीपीपी तत्वावर विकसित करावे या खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचनेचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केले आणि भविष्यात ठाणे जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचे संकेतही दिले.
औद्योगिक क्षेत्रांजवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क म्हणजे एकात्मिक सुविधा केंद्र उभारले जात आहेत. जिथे उत्पादन, वेअरहाउसिंग (गोदाम) आणि वितरण एकत्र आणले जाते. ज्यामुळे वाहतूक आणि पुरवठा साखळी सुलभ होते. यात उत्तम कनेक्टिव्हिटी (रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे), तंत्रज्ञानाचा वापर आणि टिकाऊपणा यांसारखी वैशिष्ट्ये असतात. ज्यामुळे जलद वितरण आणि व्यवसायांची वाढ होण्यास मदत होते. हाच धागा पकडून आज लोकसभेतील प्रश्नकाळात खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाच्या दृष्टीने ठाण्यामध्ये पीपीपी (पब्लिक–प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलच्या आधारे लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न सभागृहात मांडला. यावेळी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टपणे सांगितलं की, देशाची पुरवठा साखळी सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांच्या जवळ आधुनिक लॉजिस्टिक्स पार्क असणं अत्यंत आवश्यक आहे. मालवाहतूक, साठवणूक आणि वितरण या सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि नियोजनबद्ध करण्यासाठी अशा सुविधा काळाची गरज बनल्या आहेत.
ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असून लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. पण, सुसज्ज लॉजिस्टिक्स सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ठाण्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात लॉजिस्टिक्स पार्क उभारलं तर उद्योगांना मोठा फायदा होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात नमूद केलं.
या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मक भूमिका मांडली. ठाणे जिल्ह्याची एकंदर गरज नेमकी किती आहे, याचा सखोल अभ्यास करून भविष्यात ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात लॉजिस्टिक्स पार्क उभारण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असं त्यांनी सभागृहात सांगितलं. तसेच, खासदार नरेश म्हस्के यांनी मांडलेल्या सूचनेचं त्यांनी स्वागत केलं.
