Monday, December 22 2025 1:16 am
latest

द्रास येथील भारतीय लष्करी तळावर ‘लेझर शो’तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून तीन कोटींची मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा धनादेश सैन्यदलाकडे सुपूर्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला

कारगिलमधील ‘सरहद्द शौर्यथॉन-2025’ स्पर्धेला एकनाथ शिंदेंनी दाखवला झेंडा..

द्रास (जम्मू आणि काश्मीर) 23 :- कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्याना व्हावी यासाठी सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केले होते. यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटींचा निधी भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘सरहद्द शौर्यथॉन-२०२५’ या स्पर्धेचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी भारतीय सैन्यदलातील प्रमुख अधिकारी, सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. भारतीय सैन्यदलांचे शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते.

यातील पहिली 21. 097 किमीच्या सर्वात आव्हानात्मक दौडीला म्हणजेच ‘ऑपरेशन विजय दौड’ असे नाव देण्यात आले होते. ही दौड कारगिल वॉर मेमोरियलपासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन तिची सांगता करण्यात आली. तर १० किमी लांबीची दुसरी दौड ही ‘टोलोलिंग दौड’ म्हणून ओळखली गेली. तर तिसरी दौड ही ५ किमी लांबीची ‘टायगर हिल दौड’ म्हणून ओळखली गेली, तर चौथी आणि शेवटची म्हणजे 3 किमी लांबीची ‘फ्युचर हिरोज दौड’ या नावाने ओळखली गेली. या सर्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेबद्दल बोलताना शिंदे यांनी, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे हाच उद्देश असल्याचे सांगितले. तसेच या स्पर्धेचे यशस्वी आयोजन आयोजक संस्थेचे आभार मानले. या उद्घाटन सोहळ्यानंतर शिंदे यांनी कारगिल येथील ‘ऑपरेशन विजय’मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना मानवंदना दिली. तसेच कारगिल येथील युद्ध संग्रहालयाला भेट देऊन त्याचीही पाहणी केली.

द्रास येथील लष्करी तळावर ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा तीन कोटींचा धनादेश लष्कराचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे शिंदे यांनी सुपूर्द केला. गतवर्षी मुख्यमंत्री असताना आपण कारगिलला आलो असता या लेझर शोसाठी निधी देण्याचे आपण मान्य केले होते. त्यानुसार आपण दिलेला शब्द पाळल्याचे शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.