ठाणे, 10:- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी थकीत मुद्दल व व्याज एकरकमी परतावा (One Time Settlement) योजना जाहीर करण्यात आली आहे. थकित कर्जदारांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनेचा लाभ घेऊन कर्ज खाती बंद करुन कर्जमुक्त व्हावे, तसेच कायदेशीर कार्यवाही टाळावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.एन.व्ही. नार्वेकर यांनी केले आहे.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या ठाणे जिल्हा कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत इतर मागस प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याज दराने कर्ज वितरीत करण्यात आले आहे. कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु कर्जाची मुदत संपलेल्या व कर्जाची मुद्दल व व्याज रक्कम थकित असलेल्या लाभार्थीसाठी कर्जावरील संपूर्ण थकित व्याज रक्कमेवर ५०% सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज एकरकमी परतावा (One Time Settlement) योजनेचा लाभ घ्यावा व आपली रक्कम ३१ मार्च २०२५ पूर्वी भरून खाती बंद करुन कर्जमुक्त व्हावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी एन.व्ही. नार्वेकर, जिल्हा व्यवस्थापक, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
