Tuesday, August 18 2026 10:05 am

शिवसेना महायुतीला विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र परिवर्तन सेना, अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे महायुतीला समर्थन

महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा केला निर्धार

मुंबई, १५ – महाराष्ट्रातील ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र परिवर्तन सेना आणि अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटना या संघटनांनी विधानसभा निवडणुकीसाठी शिवेसना महायुतीला पाठिंबा दिला आहे. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली.

राज्यात मागील दोन वर्षात महायुती सरकारने विकास कामांना प्राधान्य दिले आहे. मुंबई, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधा आणि विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. लाडकी बहिण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बसमधून मोफत प्रवास, युवकांसाठी कौशल्य विकासाच्या विविध योजना महायुती सरकारने राबवल्या. राज्यात पुढेही विकास कामे सुरुच राहण्यासाठी महायुतीचे सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे. त्यासाठी ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे पक्षाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी सांगितले.

राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी आणि एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमदेवारांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेने निवडणुकीत शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला आहे. मागील दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून शेतकरी, कष्टकरी कामगार, युवक, युवती, ज्येष्ठ, महिलांच्या हिताचे निर्णय घेतले. सर्वसामान्यांचे कैवारी म्हणून लोकप्रिय झालेले एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना पक्षाला पाठिंबा देत असल्याचे अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण कानवडे यांनी सांगितले