नवी दिल्ली, 11 – वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) सदस्य पदी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडण्यात आले. यावेळी हे विधेयक संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) कडे पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आला. या विधेयकावर प्रथम समिती मध्ये चर्चा होणार आहे. अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी देशातील विविध राज्यांतील २१ खासदारांची नियुक्ती संयुक्त संसदीय समितीच्या सदस्य पदी आज केली. महाराष्ट्र राज्यातून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना या समितीवर नेमण्यात आले आहे. वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठीच हे विधेयक असल्याचे मत नियुक्ती नंतर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देतांना व्यक्त केले.
नियुक्ती झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
