Friday, February 6 2026 12:00 am

१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास करदात्यांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात मिळणार १० टक्के सूट

वेळेवर करभरणा करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन

ठाणे ०१ : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ०१ एप्रिल, २०२४ रोजी तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना एसएमएसच्या रुपाने पाठविण्यात आली आहे. तसेच, मालमत्ता कराची छापील देयकेही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. करदात्यांनी, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर (थकीत रकमेसह) एकत्रितपणे महापालिकेकडे १५ जूनपर्यंत जमा केल्यास दुस-या सहामाहीच्या सामान्य करावर १० टक्के सूट देण्यात येणार आहे.

करदात्यांना सवलत

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर (थकित रकमेसह) एकत्रितपणे महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. 15 जूनपर्यंत 10 टक्के, 30 जूनपर्यंत 04 टक्के, 31 जुलैपर्यंत 03 टक्के आणि 31 ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास 02 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र. कालावधी सुट (%)
1. दि. 01.04.2024 ते दि. 15.06.2024 – 10%
2. दि. 16.06.2024 ते दि. 30.06.2024 – 4%
3. दि. 01.07.2024 ते दि.31.07.2024 – 3%
4. दि. 01.08.2024 ते दि. 31.08.2024 – 2%

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके एसएमएस व लिंकच्या माध्यमातून करदात्यांना ०१ एप्रिल, २०२४ पाठविण्यात आली आहे. या एसएमएसमध्ये मालमत्ता कर भरण्याची लिंक करदात्यास उपलब्ध करुन देण्यात आली असून, यास ठाणेकर करदात्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे. ठाणेकरांच्या या प्रतिसादाबाबत महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहेत. मालमत्ता कराची देयके प्रिंट करुन आता करदात्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. तसेच propertytax.thanecity.gov.in या लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध असून याद्वारे कर ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कर संकलन केंद्रे सुरू

महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत तसेच शनिवारी व सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायं. ४.३० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
या शिवाय, मालमत्ताधारक आपला मालमत्ता कर क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, चेक, डीडी तसेच रोखीने भरणा करू शकतात. तसेच Google Pay. PhonePe, BHIM APP, Paytm मार्फत सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करू शकतात. ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.