Thursday, February 5 2026 9:19 pm

मतदान जागृतीसाठी ठाणे महापालिकेने तयार केला मॅस्कॉट

नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

ठाणे ०१ : येत्या २० मे रोजी होणाऱ्या मतदानास जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा साठी स्विपअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेने या मतदान जागृतीसाठी शुंभकर (मॅस्कॉट) तयार केला असून तो ठाणे महापालिका क्षेत्रात जागृती करणार आहे. या मॅस्कॉटचे अनावरण ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सेंट्रल पार्कसारखी मोठी उद्याने, मॉल, एस टी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन आदी भागात हा मॅस्कॉट मतदान करण्याचा संदेश ठाणेकर मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. तसेच, मॅस्कॉटच्या अनावरणाच्या निमित्ताने, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पुन्हा केले आहे. लोकशाही बळकट करणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे. मतदानाचा दिवस हा सोमवारचा आहे. त्यामुळे शनिवार-रविवार जोडून सुट्टया जरी आल्या असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असेही आयुक्त राव यांनी आवाहन केले.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे.