Friday, March 13 2026 10:29 pm

आमटे दांपत्याचा सन्मान केल्यामुळे ‘महाराष्ट्र भूषणचे’ भूषण वाढले

 

आयुष म्हात्रे ठरला युथ आयकॉन तर कृष्णमेघ कुंटे यांना वसुंधरा साथी सन्मान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मटा सन्मान सोहळा संपन्न

मुंबई, 13 – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम हेमलकसा परिसरात आयुष्य वाहून आदिवासी समाजाची सेवा करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यामुळे हेमलकसा हे सामाजिक कार्याचे तीर्थक्षेत्र बनले आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मटा सन्मान २०२६ सोहळ्यात या दांपत्याला ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले असून हा सन्मान देण्याचे भाग्य मला लाभले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित मटा सन्मान २०२६ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

मराठी मनोरंजन क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गेली २६ वर्षे महाराष्ट्र टाइम्सतर्फे दिल्या जाणाऱ्या मटा सन्मान पुरस्कारांची परंपरा अत्यंत महत्त्वाची असल्याचे शिंदे यांनी सांगितले. चित्रपट, नाटक, वेबसीरिज, टीव्ही मालिका, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा शोध घेऊन त्यांचा गौरव केला जातो, ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर आणि संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन केले.

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, डॉक्टर झाल्यानंतर अनेकांना शहरात राहून प्रॅक्टिस करण्याचा मोह होतो. मात्र त्या मोहाला दूर ठेवून या दांपत्याने दुर्गम भागातील लोकसेवेची खडतर वाट निवडली. त्यांनी स्वतःला पूर्णपणे समाजकार्यासाठी झोकून दिले. त्यांच्या कार्यामुळे हेमलकसा हे सामाजिक कार्याचे तीर्थक्षेत्र बनले असून तेथे गरीब, शोषित आणि वंचित लोकांची सेवा होत आहे.

बाबा आमटे यांच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेताना प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांनी त्याला नवा आयाम दिला, असेही शिंदे यांनी सांगितले. आदिवासी समाजाचा विश्वास संपादन करताना या दांपत्याला मोठा संघर्ष करावा लागला. विशेषतः आदिवासी महिलांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आणणे, त्यांचे समुपदेशन करणे हे अत्यंत कठीण काम होते, असे त्यांनी नमूद केले.

या दांपत्याने अतिशय कठीण परिस्थितीत जीवन घालवले असून संघर्षाच्या काळात ते कधी खचले नाहीत आणि यश मिळाल्यानंतरही ते कधीही बदलले नाहीत, असे सांगत शिंदे यांनी त्यांच्या साध्या राहणी आणि उच्च विचारसरणीचे कौतुक केले. काही काळ ते आजारी असताना आपण त्यांना भेटायला गेलो होतो आणि महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे ते लवकर बरे होतील असा विश्वास आपण त्यांना दिला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

यावेळी यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भारताच्या अंडर-१९ विश्वविजेता संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचेही त्यांनी अभिनंदन केले. पालघर जिल्ह्यातील विरार येथील हा तरुण क्रिकेटपटू भविष्यात भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच वसुंधरा साथी सन्मान मिळालेल्या पर्यावरणतज्ज्ञ कृष्णमेघ कुंटे यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. फुलपाखरांवर केलेले त्यांचे संशोधन पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य सरकारही पर्यावरणपूरक विकासासाठी विविध उपाययोजना करत असून मॅंग्रोव्ह संरक्षणासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.

मटा सन्मान पुरस्कारामुळे अनेकांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. नामांकन मिळणेही अनेकांसाठी अभिमानाची बाब असते. गेल्या २६ वर्षांत महाराष्ट्र टाइम्सने या पुरस्कारांद्वारे मोठी विश्वासार्हता निर्माण केली आहे, असे शिंदे म्हणाले.

राजकारणावर हलक्याफुलक्या शब्दांत भाष्य करताना ते म्हणाले, “राजकारण हीदेखील एक मोठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री झाली आहे. नाटकात दोन अंक असतात; मात्र राजकारणात तिसरा, चौथा आणि पाचवाही अंक असतो. पडदा पडल्यानंतर पडद्यामागे घडणारे नाट्य अधिक रंगतदार असते.”

राजकारणातील कार्यकर्ते संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून येतात, असे सांगत त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटना, महापुरांसारख्या आपत्ती किंवा परदेशात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.

मटा सन्मान पुरस्कारांद्वारे अनेक पडद्यामागील व्यक्तींना समाजासमोर आणले जाते, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत शिंदे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्कृतिक मंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर,अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मराठी सिने,नाट्य,टिव्ही,ओटीटी क्षेत्रात काम करणारे सर्व कलाकार,दिग्दर्शक,निर्माते, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.