मुंबई, 28 : राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय‘ उभारण्यात येत आहे. इमारतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेऊन बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या या महाविद्यालयाच्या भव्य आणि अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामाची पाहणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. या पाहणीवेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आदिनाथ मंगेशकर, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच नवे काही शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. आधुनिक सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळेल.
देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत शिक्षण संस्था उभी राहावी आणि भारतीय संगीत परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचावा, या उद्देशाने राज्य शासनाकडून या भव्य व अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून पारंपरिक तसेच आधुनिक संगीत शिक्षणाला चालना मिळून राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
