अमरावती, 28 : केंद्रीय सतर्कता विभागाच्या वतीने संपूर्ण देशात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मुलन सप्ताह पाळण्यात येतो. यानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, सुरज वाघमारे, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, रविंद्र हजारे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 27 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण देशात भष्ट्राचाराविरुध्द आवाज सक्षम होण्यासाठी सप्ताह पाळण्यात येतो. भष्ट्राचाराविरुध्द लढणाऱ्या सर्व संबंधितांना एकत्र आणून जनप्रबोधन करणे व भष्ट्राचारामुळे पीडित असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना दिलासा देणे हे सप्ताहाचे उद्दीष्ट आहे. शासन व प्रशासनाच्या कारभारात नैतिकता व पारदर्शीपणा आणून अधिक संवेदनशीलतेने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द होण्यासाठी सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘देशाचा विकास सत्यनिष्ठेच्या संस्कृतीवर अवलंबून असतो’ या बोधवाक्यावर हा सप्ताह आधारित आहे.
देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा आहे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिकपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबध्द असायला हवे तसेच भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पध्दतीने करेन. जनहितासाठी कार्य करेन. व्यक्तिगत वागणूकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन, अशी प्रतिज्ञा विभागीय आयुक्तांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना यावेळी दिली.
