Monday, December 22 2025 7:46 am
latest

वंचित उपेक्षितांसाठी झटणारे महादेव कांबळे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

ठाणे, 16 : आपल्या आयुष्यातील ४० वर्षांहून अधिक काळ समाजसेवा, शिक्षण, साहित्य, वंचित व उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी अतुलनीय योगदान देणारे आणि आजही वयाच्या 83 व्या वर्षी सतत समाजासाठी कार्य करणारे महादेव कांबळे यांना नुकतेच कोकण मराठी पत्रकार संस्थेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
खेड मधील भरणे येथील मंगल कार्यालयात नुकताच हा सत्कारसोहळा पार पडला. या कार्यक्रमास गृह राज्यमंत्री योगेश कदम, पत्रकार अनिलराज रोकडे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, कोकण मराठी पत्रकार संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर , पत्रकार दिलीप देवळेकर आदी उपस्थित होते.
महादेव कांबळे 1957 मध्ये मुंबईत आले. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना सेंच्युरी मिलमध्ये नोकरी लागली. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना सतत त्यांच्या मनात होती. गावासाठी समाजासाठी काहीतरी करावे या भावनेने त्यांनी मिलमध्ये नोकरी करता करता स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले.गावचा विकास हा आपल्याला शिक्षण देणाऱ्या शाळेपासून करावा असा हेतू ठेवून त्यांनी सर्वप्रथम अलाटीवाडी शाळेसाठी कपाट व खुर्च्या घेतल्या. हळूहळू शाळेसाठी हातभार लागत असताना त्यांनी बिरवटकर वाडीचे मंडळ स्थापन केले. एक वाडी, तीन वाड्या असे करत करत पोयनार गावातील सर्व गवळी समाज त्यांनी एकत्र केला. सर्वप्रथम पोयनार गावामध्ये त्यांनी वीज आणली. नळपाणी योजना अशी अनेक कामे त्यांनी तत्कालीन आमदार तु.बा. कदम यांच्या निधतिून करुन घेत गावचा विकास करण्यामध्ये महत्वाचा हातभार त्यांनी लावला. धामणी येथील आर जी काते विद्यामंदिर बांधतेवेळी महादेव कांबळे यांनी सढळ हस्ते वर्गणी व देणगी स्वरुपात सहकार्य केले. आजवर त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेवून श्री. महादेव कांबळे यांनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.