Sunday, April 12 2026 1:37 am

लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

 

ठाणे 10 : ठाणे महानगरपालिका क्षेत्राातील लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज चौक, आर.जे. ठाकूर कॉलेज नाका तसेच कामगार नाका परिसरात होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, नगरसेविका कांचन चिंदरकर, शितल ढमाले, उपायुक्त उमेश बिरारी, दिनेश तायडे, कार्यकारी अभ‍ियंता संदीप सावंत आदी उपस्थित होते.

या परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पी वन, पी टू अशा प्रकारे पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे जुनी वाहने, भंगारमध्ये नादुरूस्त अवस्थेत असलेली, गंज लागून जीर्ण झालेली वाहनांची संख्या मोठी आहे, अशी वाहने अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या बैठकीत दिल्या.

शास्त्रीनगर नाका, हत्तीपूल येथे बसेसकरिता पार्किंगचे दोन प्लॉट देण्यात यावे अशी सूचना सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी केली. इंदिरानगर ते रोड नं. 22, लोकमान्यनगर पाडा, आर.जे. ठाकूर व इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये परिवहन बसेसची संख्या वाढविली तर या परिसरातील वाढणाऱ्या रिक्षांवर आळा बसेल अशी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी केली.

प्रभागातील रस्त्यांवरील सोसायट्यासमोर नागरिकांनी अवैध रित्या पार्क केलेल्या वाहनांवर नियमित कार्यवाही करावी. यशोधन नगर येथून डेपोकडून जाणारे रस्ते या ठिकाणी असलेल्या गॅरेजवाल्यांवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करावी, गोमास्ता लायनेन्स कार्यालय परिसरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी, या विभागात मंगळवारचा आठवडी बाजार बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित विभागाला दिल्या.