Friday, March 13 2026 1:05 pm

यवतमाळ नगरपरिषदेतील अमृत योजनेतील निविदा प्रक्रियेतील तक्रारींची ३० दिवसांत चौकशी – डॉ. मंत्री उदय सामंत 

 

मुंबई, 13 : यवतमाळ नगरपरिषदमध्ये अमृत योजनेंतर्गत ४२ पैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत.  तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजनेंतर्गत यवतमाळ नगरपरिषदेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यामार्फत ३० दिवसांत चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

सदस्य धीरज लिंगाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, बायोमायनिंग प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व नाले सफाई, अग्निशमन केंद्र बांधकाम आणि अमृत योजनेतील पाईपलाईन या कामांच्या निविदा प्रक्रियेत तक्रारी आल्यामुळे काही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत.

बायोमायनिंग प्रकल्पासाठी नव्याने पाच निविदा प्राप्त झाल्या असून लवकरच काम अंतिम करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन निविदा प्रक्रिया आठ दिवसांत सुरू होणार आहे, तर अग्निशमन केंद्र बांधकामासाठी सुधारित निविदेला मंजुरी देण्यात आली असल्याचे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी –शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

  • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

मुंबई, दि.१२ : राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यास शालेय शिक्षण विभागाने प्राधान्य दिले आहे. यासाठी विभागाने कडक नियमावली जारी केली आहे.  या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर करणार  असल्याचे  शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य प्रसाद लाड  यांनी याविषयी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य डॉ. मनीषा कायंदे, सदस्य राजहंस सिंह, जगन्नाथ अभ्यंकर, चित्रा वाघ, अमित गोरखे आणि उमा खापरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तक्रार पेटी ठेवणे, सखी-सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जात असून अशा घटनांची माहिती २४ तासांच्या आत शिक्षण अधिकारी व पोलिसांना देणे अनिवार्य आहे. अशा घटना दडपण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, विद्यार्थिनींच्या वाहतुकीसाठी शाळा बसमध्ये महिला अटेंडंट, तसेच विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’, सायबर गुन्हे आणि स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहावीच्या पुढील वर्ग असलेल्या मुलींच्या शाळांमध्ये ‘पिंक रूम’ ची संकल्पनाही राबविण्याचे नियोजन आहे. प्री-प्रायमरी शिक्षणासाठी नवीन अधिनियम अंतिम टप्प्यात असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.