Friday, October 30 2026 12:31 pm

मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 30 : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्यंगचित्रकला ही एक अशी प्रभावी कला आहे, जिथे एकही शब्द न उच्चारता हवे तेवढे प्रभावी फटके मारता येतात आणि नेमके सांगायचे ते लोकांपर्यंत पोहोचवता येते. कोणत्याही काळातील घडामोडी असोत किंवा विरोधाभास असो, तो सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे काम मराठी व्यंगचित्रकारांनी केले आहे.

व्यंगचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. ही एक विलक्षण कला आहे. जी महाराष्ट्राच्या मातीने आधीपासून जोपासली आहे. ही कला भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगतात व्यंगचित्रकलेच्या शैलीतील ‘रीडिंग इन बिटवीन लाईन्स’ म्हणजेच रेषांमधला अर्थ समजावून सांगत व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आलेले अनुभव, ‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास तसेच व्यंगचित्रकार हा नेहमीच समाजातील विसंगतीवर चोख बोट ठेवतो, याचे महत्त्व स्पष्ट केले. शासन पुढाकार घेऊन व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढताना रेषांचे महत्त्व, स्वाभिमान आणि अचूक टिपण असावे, असे सांगत जुन्या काळातील व्यंगचित्रविश्वातील आठवणींना उजाळा दिला. संस्कृती आणि कलेच्या व्यासपीठावर एकत्र येणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रचंड परिश्रमांचे कौतुक केले. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि ‘ग्रंथाली’च्या सदस्यांनी घेतलेली मेहनत आणि गोळा केलेली ऐतिहासिक व्यंगचित्रे ही महाराष्ट्राच्या भावी पिढीसाठी एक अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कार्याचा गौरव करत पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाचे अध्ययन केंद्राचे काम सुरू केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला व्यंगचित्रकार, कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.