ठाणे 10 : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 15 मधील लोकमान्यनगर परिसरात आज महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहिम (Deep Clean Drive) राबविण्यात आली. या मोहिमेत रस्ते सफाईबरोबर, रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. ठाणे शहरातील सर्वच प्रभागात ही मोहिम व्यापक स्वरुपात राबविली जाणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले तर प्रभागात दुतर्फा उभ्या असलेली वाहने तातडीने हटविण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित सहायक आयुक्तांना दिल्या.
आज लोकमान्यनगर परिसरात राबविण्यातआलेल्या या मोहिमेत आमदार संजय केळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक सुरेश कांबळे, यज्ञा भोईर, अनिता यादव यांच्यासह उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छतेची शपथ घेवून या अभियानास प्रारंभ करण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहिम ठाणे शहरात सुरू आहे. महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ही मोहिम सर्वच प्रभागात अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमे आज 6.5 टन कचरा व माती उचलण्यात आली. तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यात आले.
इंदिरानगर नाका हे वर्दळीचे ठिकाण असून या ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपण उभ्या असलेल्या गाड्या तातडीने काढून नागरिकांना रस्ते मोकळे करुन देण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाला दिल्या. यावेळी सार्वजनिक शौचालयाची पाहणी देखील महापौर व आयुक्तांनी केली. तसेच सार्वजनिक शौचालयांची साफसफाई नियमित राहील व शौचालयात पाणी उपलब्ध असेल याकडे लक्ष देण्याबाबतही त्यांनी सूचित केले.
या अभियानात तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील 120 कामगार,2 शौचालय सफाई जेटिंग गाडी. 3 आर्यन जेटिंग गाड्या, घंटागाडी आदीच्या सहायाने स्वच्छता करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता संदीप सावंत, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी, लक्ष्मण पुरी, मारुती कवळे, सर्व स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांच्यासह बांधकाम विभाग. अतिक्रमण विभाग. गार्डन विभाग ड्रेनेज विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
