* सन 2022 पासून तक्रारी करूनही कारवाई नाही, लहान मुलांसह कुटुंबाचे बेमुदत उपोषण
* श्रीनगर पोलिसांकडून तक्रारदारावरच कारवाईचा इशारा
ठाणे 16 – इंदिरा नगर, रुपादेवी पाडा नंबर २, रोड नंबर ३३/३४, मशिदीजवळ वागळे इस्टेट, ठाणे येथे शासकीय भूखंडाबर नवाबी इन्तेजामियाँ कमिटीने बांधलेल्या मदरसा आणि मशिदीचे बेकायदेशीरपणे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाच्या नादात येथील नागरिकांची वहिवाटच बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक रवींद्र गुप्ता यांनी सन 2022 पासून तक्रारी करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून गुप्ता कुटुंबियांनी ठाणे महानगर पालिकेसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या उपोषणाने कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा करीत श्री नगर पोलिसांनी गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्तत केला जात आहे.
इंदिरा नगर, रुपादेवी पाडा नंबर २, रोड नंबर ३३/३४, मशिदीजवळ वागळे इस्टेट, ठाणे येथे शासकीय भूखंडाबर नवाबी इन्तेजामियाँ कमिटीच्या माध्यमातून एक मदरसा आणि मशिद बांधण्यात आलेली आहे. ही मशिद अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे. आधी अत्यंत छोटेखानी असलेली ही मशिद आता विस्तारण्यात आलेली आहे. या मशिदीच्या मागील भागात एक मोठा शासकीय भूखंड आहे. या ठिकाणी सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी मशिद बांधली होती. सुफी मोहम्मद अहमद शेख हे हयात असताना त्यांच्या साह्याने स्थानिक नागरिकांनी एक सामायिक पाण्याची टाकी उभारली होती. ही टाकी उभारताना रवींद्र गुप्ता यांच्या घराच्या भिंतीपासून दहा फूट जागा सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी सोडली होती. या पाण्याच्या टाकीतून गुप्ता, इतर रहिवाशी तसेच सदर मशिदीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, सुफी मोहम्मद अहमद शेख यांचे निधन झाल्यानंतर नवावी इन्तेजामियाँ कमिटीने या मशिदीचा ताबा घेतला आहे. हा ताबा घेतल्यानंतर कमिटीने मशिदीचे बेकायदेशीरपणे विस्तारीकरण सुरु केले आहे. हे विस्तारीकरण करीत असताना त्यांनी मशिदीच्या आजूबाजूला व्यावसायिक गाळ्यांची उभारणी केली आहे. आता तर या नवावी इन्तेजामियाँ कमिटीने रहिवाशांच्या भिंतीचा वापर करुन बेकायदेशीरपणे बांधकाम सुरु केले आहे. या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी पाडण्यात आलेली आहे. गुप्ता यांच्या घरालगत नवाबी इन्तेजामियाँ कमिटीने मुतारी आणि अन्य बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे, हे बांधकाम करीत असताना पाण्याच्या टाकीपासून पूर्वी सोडण्यात आलेली १० फूट जागादेखील कमिटीने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे नागरिकांची वहिवाटच बंद झाली आहे. याबाबत रवींद्र गुप्ता यांनी ठामपा आणि पोलिसांकडे 23 मार्च 2022 रोजी पहिली तक्रार केली होती. त्यानंतर वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने त्यांनी ठामपा मुख्यालयासमोर सोमवारपासून (दि. 16) बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात रवींद्र गुप्ता यांनी सांगितले की, सदर ठिकाणी अधिकृत की अनधिकृत बांधकाम सुरू आहे, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. मात्र, रहिवाशांची वहिवाटच अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही तक्रार अर्ज केल्यानंतर काही लोक शक्तिप्रदर्शन करीत असतात. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी, मशिदीच्या अतिरिक्त बांधकामामुळे धार्मिक तणावही निर्माण होण्याची शक्यता आहे. सुफी मोहम्मद अहमद शेख यांनी सामाजिक समतेच्या उद्देशाने उभारलेल्या या मशिदीच्या माध्यमातून आता धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच हे अतिरिक्त बांधकाम जमीनदोस्त करून आमची वाट खुली करून द्यावी, या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. हे बांधकाम पाडल्यानंतरच आम्ही आमचे उपोषण संपवू, असेही गुप्ता म्हणाले.
