Sunday, December 21 2025 11:38 pm
latest

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

छत्रपती संभाजीनगर, 21: राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नियोजन विभागाचे उपायुक्त विजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे नियोजन अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले, “युनिक पायाभूत सुविधा आयडी पोर्टल ही नवी संकल्पना असून या तंत्रज्ञानाचा वापर करून विकासकामांची सुसूत्रता, समतोल विकास व खर्चबचत साधता येणार आहे.”

राज्यात १ ऑक्टोबर २०२५ पासून प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक आयडी अनिवार्य असणार आहे. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, देयके, तसेच मंजुरीपासून अंमलबजावणी व देखभालपर्यंत सर्व माहिती या आयडीद्वारे ट्रॅक केली जाणार आहे.

प्रशिक्षणात नव्या सुविधेची नोंद पोर्टलवर कशी करायची, मॅपिंग पद्धती, कामांचे स्वरूप व निकषांनुसार नोंदणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र, नागपूरचे श्री. अभिजित व श्री. स्वराज यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण केले.

प्रास्ताविक उपायुक्त (नियोजन) विजय पवार यांनी केले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. संजय पाटील, विभाग प्रमुख (मुंबई व पुणे), महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र यांनी पोर्टलच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी व प्रमुख यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.